PL READ IN YOUR OWN LANGUAGES (Offcorse withsome inaccuracires - भाषांतरण)

Saturday 10 March 2012

कॅप्टन आनंद राव (Capt Annand Rowe) एक मनस्वी व्यक्तिमत्व. भाग 1

   कॅप्टन आनंद राव (Capt Annand Rowe)  
एक मनस्वी व्यक्तिमत्व.

 
   
आजच बातमी आली की, कॅप्टन आनंद राव स्वर्गवासी झाले आणि कॅप्टन रावांच्या विस्मृतींचा उजाळा झाला. पांढरेशुभ्र भुरभूरीत केसांचं टोपलं. निळसर झाक असलेले डोळे. कानाच्या खालपर्यंत आलेले कल्ले, चेहऱ्यावर सदैव हसरा भाव, असे शिडशिडीत बांधा असलेल्या एक्याण्णवावं वर्ष चालू असतानादेखील कॅप्टन रावांचा उत्साह तरूणाला लाजवेल असा होता. स्फुर्तिदायक भाषेचा वापर करण्याची शैली अनोखी होती. अगदी दोन आठवड्यांपूर्वी ते तीन मजले चढून अत्री आणि अनुसूया यांच्या नाडीग्रंथांच्या आशिर्वादासाठी चोपन्न पायऱ्या चढून आले. तेव्हा महर्षी त्यांना आशिर्वाद देताना म्हणाले, 'अरे तरूण माणसा, तुला आंतरिक आनंद हवाय ना? कर या नाडीग्रंथांची सेवा... पहा काय होतं ते'... आणि खरोखरच ते एक्याण्णव वर्षांचे तरूण महर्षींच्या ताडपत्रांच्या कथनाकडे बघून म्हणाले, यस सर... आय विल डू इट!’... तो त्यांचा आवाज त्यामधील गुढार्थ तेव्हा कळला नव्हता. नंतर त्यांच्या अस्खलित इंग्रजीमधून त्यांनी नाडीग्रंथांचा केलेला गौरव जेव्हा व्हिडीओवर अवतरित झाला, तेव्हा त्यांचे डोळे, त्यांच्या कथनातील आदरभाव हा आज एक चर्चेचा विषय आहे. 

      एक दिवशी आमचे सर्व कुटुंबिय त्यांच्या घरी पोहोचल्यावर म्हणाले, काय ऐकायची इच्छा आहे? आम्ही सर्वांनी त्यांना विनंती केली. 'शेरलॉक होम्स आम्हाला ऐकायला आवडेल'. साधारण तासभर चालेल बरं का असं म्हणत कॅप्टन राव त्यांच्या घराच्या गोल टेबलाशेजारच्या त्यांच्या आवडत्या जागेत स्थानापन्न झाले. मी आणि अलका समोरच होतो. एका बाजूला चिन्मय आणि त्याची पत्नी वरदा आणि दुसऱ्या बाजूला माझे जावई पराग आणि मुलगी नेहा आणि या सगळ्या कार्यक्रमाला घडवून आणणारा माझा चुलत भाऊ प्रकाश ओक असे थोड्याशा मिणमिणत्या प्रकाशात बसलो होतो. माहोल शेरलॉक होम्सच्या एका गुप्तहेर कथेचा होता. शेरलॉक होम्सनी त्यांचा तो बाकदार पाईप तोंडात धरून एक मॅचबॉक्समधून काडी काढून पाईप पेटवला आणि वॉटसनकडे बघून त्यांनी म्हटलं, आता बहुतेक दारावर टकटक होईल. तिकडे दारावर टक-टक! आणि पुढे ती कथा चालू राहिली. कथा ऐकताना त्यातील स्कॉटिश, ब्रिटिश आणि काही कॅरॅक्टरर्सचे स्पॅनिश आणि ग्रीक संवाद कॅप्टन रावांच्या तोंडातून त्या त्या भाषेच्या बाजातून इंग्रजी येत असताना आम्ही जणू काही वॉटसमनच्या बरोबरच शेरलॉकच्या लंडनमधील 221बी, बेकर स्ट्रीटमधील केलेल्या प्रत्येक कृतीच्या पासून अगदी पाच फुटावर असल्याचा आभास निर्माण होत होता. राव कथाकथनाच्या त्या धुंद वातावरणाचे निर्माते होते. आम्हाला ते त्या काळात घेऊन गेले. शेरलॉक होम्सनी सोडवलेला तो किचकट रहस्याचा गुंता अगदी सहजपणे सुटला नी आम्ही प्रचंड आवेगाने टाळ्या वाजवून कॅप्टन साहेबांच्या त्या कथाकथनाचा, त्यातील शैलीचा, प्रत्येक तपशिलाचा आणि त्यामधील आणि त्यामधील रहस्याचा इतके लीलया कथन कसे झाले, कसे करतात असे म्हणत चर्चा करत राहिलो.
      खरतर कॅप्टन रावांचा हा एक आगळा छंदच. माझा भाऊ प्रकाश म्हणाला, गेले कित्येक वर्ष मी माझ्या संध्याकाळी कॅप्टन रावांच्या समवेत बसून अनेक अशा साहित्यिक कलाकृती ऐकून कानात साठवल्या. कथनासाठी महत्वाच्या भागांचा अतिशय सूक्ष्म उल्लेख करुन देणारी त्यांची प्रचंड स्मरणशक्ती, घटना ज्या भागात होते त्या भागातील भौगोलिक आणि सांस्कृतिक परिप्रेक्षाचे आकलन नीट व्हावे म्हणून त्याचा सदैव कटाक्ष. आधून मधून काही क्वचित ठिकाणी स्पॅनिश भाषेच्या संवादाची उकल करून सांगताना मराठी कथनातून, आता असं बघा बरं का.. म्हणायची स्टाईल. मनात घर करुन राहयची.

एखादी कादंबरी आणून द्याना. छान कथा सांगायसाठी असेल तर आणि नव नव्या कलाकृतींची ओळख आम्हाला होई. प्रकाश मला सांगताना म्हणाला होता. आमचा कादंबरी कथनाचा कार्यक्रम चालू राहिला. समोर ग्लासमध्ये व्हिस्कीचे पेग, त्यात सोडा पण बर्फ नाही, थोडसं चॅवमॅव आणि आसपास त्यांनी जलरंगात तयार केलेली निसर्गचित्रं. काही पूर्ण होऊन तयार, काही थोड्याश्या टचच्या प्रतिक्षेत, तर काही आपल्या गालांवरून गोंजारून निसर्गाने नटायला सज्ज झालेले कॅनव्हास ब्रशच्या नाजुक फटकाऱ्यांची वाट पाहताहेत. कॅप्टन रावांच्या रंगवलेल्या रंगात ओढलेल्या ब्रशची! त्यांच्या निसर्गचित्रांची एक वेगळीच आगळी शैली आहे. त्यात कुठेच माणूस दिसत नाही. एक वाट, थोडासा चढाव किंवा टेकडीवजा डोंगर, डोंगराच्या आसपास हिरवळ, त्या पायवाटेतून जाण्याकरता निर्माण झालेला कोरड्या जमीनाचा भाग आणि आकाशातील विविध मोसमांच्या छटा परंतु 
खासकरून आभाळलेलं, पाण्याने ओथंबलेल्या ढगांचं आभाळ, असा थोडासा मंद सांयकाळचा निसर्ग. ही त्यांच्या चित्रातील वैशिष्टय. हिरव्या रंगाचा भरपुर उपयोग हाही त्याचा भाग. कॅप्टन रावांचा एक्याण्णव्या वर्षाचा प्रवास सांगताना ते म्हणाले होते, मला एक बहिण आणि दोघं तिघं भाऊ. जाता आता फक्त मी आणि माझा एक मोठा थोरला भाऊ असे उरलोयत. तो तिकडे कॅनडात असतो, मी इथे एकटा. पुढे चालू...

No comments:

Post a Comment