Translate भाषांतरण

Saturday, 10 March 2012

कॅप्टन आनंद राव (Capt Annand Rowe) एक मनस्वी व्यक्तिमत्व.भाग 2

 कॅप्टन आनंद राव (Capt Annand Rowe) एक मनस्वी व्यक्तिमत्व.भाग 2

(कॅप्टन रावांच्या मनस्वी व्यक्तिमत्वाचा एक पैलू - त्यांनी केलेल्या त्यांच्या नावाच्या स्पेलिंग मधून प्रकट होतो. म्हणून इथे त्याचा उल्लेख)
पुर्व सूत्र - ’एखादी कांदबरी आणून द्या ना. छान कथा सांगायसाठी असेल तर आणि नव नव्या कलाकृतींची ओळख आम्हाला होई. प्रकाश मला सांगताना म्हणाला होता. आमचा कांदबरी कथनाचा कार्यक्रम चालू राहिला. समोर ग्लासमध्ये व्हिस्कीचे पेग, त्यात सोडा पण बर्फ नाही थोडसं चॅवमॅव आणि आसपास त्यांनी जलरंगात तयार केलेली निसर्गचित्रं. काही पूर्ण होऊन तयार, काही थोड्याश्या टचच्या प्रतिक्षेत, तर काही आपल्या गालांवरून गोंजारून निसर्गाने नटायला सज्ज झालेले कॅनव्हास ब्रशच्या नाजुक फटकाऱ्यांची वाट पाहताहेत. कॅप्टन रावांच्या रंगवलेल्या रंगात ओढलेल्या ब्रशची. त्यांच्या निसर्गचित्रांची एक वेगळीच आगळी शैली आहे. त्यात कुठेच माणूस दिसत नाही. एक वाट, थोडासा चढाव किंवा टेकडीवजा डोंगर, डोंगराच्या आसपास हिरवळ त्या पायवाटेतून जाण्याकरता निर्माण झालेला कोरड्या जमीनाचा भाग आणि आकाशातील विविध ...... विविध मोसमांच्या छटा परंतु जादा, खासकरून आभाळलेलं, पाण्याने ओथंबलेल्या ढगांचं आभाळ, असा थोडासा मंद सांयकाळचा निसर्ग. ही त्यांच्या चित्रातील वैशिष्टय. (त्यांच्या चित्राची सोय झाली ही जरूर सादर करेन)हिरव्या रंगाचा भरपुर उपयोग हाही त्याचा भाग. कॅप्टन रावांचा एक्याण्णव्या वर्षाचा प्रवास सांगताना ते म्हणाले होते, मला एक बहिण आणि दोघं तिघं भाऊ. जाता आता फक्त मी आणि माझा एक मोठा थोरला भाऊ असे उरलोयत. तो तिकडे कॅनडात असतो, मी इथे एकटा. ... 
भाग 1 वरून पुढे चालू...
 
त्यांच्या निवर्तनापुर्वीची ट्रायल रन भाग 1 ची छोटी क्लिप..

सेकंड वर्ल्ड वॉर हा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय. तरूणपणात त्यांची कॅप्टन म्हणून बढती झाली आणि त्यांच्या कारकिर्दीला अचानक एक दिवस पूर्णविराम मिळाला. म्हणाले, कसं दैव असतं पाहा. माझ्या बरोबरीचा बरॅक सहकारी (जनरल अरुणकुमार वैद्य)पुढे आर्मीचा चीफ बनला. एक दिवशी मी आर्टिलरीच्या एका तोफेजवळ बसलेलो असताना चुकून त्या आर्टिलरीमध्ये असलेला एक बॉम्ब अचानकपणे फुटला आणि मी दूर जाऊन कोसळलो. नंतर ठीक झालो, परंतु दोन कान मात्र माझे काम करेनासे झाले आणि मी ठार बहिरा झालो. ब्रिटिश आर्मीच्या नियमाप्रमाणे मला मेडिकल ग्राऊंडवर काढण्यात आले. त्या नोकरीत मला पेन्शन मिळण्यासाठीची पुर्तता न झाल्यामुळे मला पेन्शनही नव्हती अन मला ग्रॅज्युइटी नव्हती. नंतर भारतीय सरकारनेही ती नाकारली.
      अशा त्या बहिरेपणाच्या काळात भावाने मला परदेशात बोलावले त्याच्याकडे काही काळ काढल्यावर मी अमेरिकेत विविध राज्यात फिरलो, राहिलो आणि बहिरेपणावर मात करण्याकरता म्हणून वाचनाला सुरूवात केली. भाषा ऐकून न घेता वाचनाला सुरूवात केली आणि अमेरिकेत जमलेल्या विविध राष्ट्रीय संस्कृतीच्या पार्श्वभूमीच्या लोकांची वैशिष्ट्ये टिपली. त्यातच मला फोटोग्राफी, चित्रकला आदींचा शौक लागला. अमेरिकेत मला एकांनी कंटेन्ट राईटींगचे शिक्षण दिले आणि मी अनेक जाहिरातींचा मजकुर लिहायला लागलो. असं करता करता एकदा भारतात आलो असताना प्रतिभा अडव्हटायझिंगमध्ये मी नोकरीला लागलो. काही काळ पुन्हा कॅनडात जाऊन वास्तव्य केले. मध्यंतरीच्या काळात कानावर शस्त्रक्रिया करून घेऊन मी माझे बहिरेपण संपवले. आज वयाच्या इतक्या संध्याकाळी माझी ऐकण्याची क्षमता अधिक तीव्र झाल्याचे जाणवले. काही तुटपुंजे मिळणारे दरमहाचे व्याज आणि या चित्रकलेच्या माध्यमातून बनवलेली ही निसर्गचित्रे मला पोटापाण्याला पुरतात. आता माझा आनंद हा असाच कथाकथनातून आणि चित्रकलेतून मला सादर करायला आवडतो
 प्रकाश, तुम्ही भेटता तेव्हाच माझ्या खोलीत थोडीफार वर्दळ असते. अन्यथा मी आणि पुस्तके आणि माझा जुना टाईपरायटर. एक बाई सकाळी जेवण बनवून जाते आणि त्याचपैकी एखादी पोळी मी रात्री खाऊन मजेत असतो. असो. 
                                       त्यांच्या निवर्तनापुर्वीची ट्रायल रन भाग 2 ची छोटी व्हिडिओ क्लिप..

      
आज कॅप्टन गेल्याची वार्ता मला कळली आणि त्यांच्याशी अगदी अगदी एक आठवड्यापूर्वी घडलेली भेट आठवली. मंगेशकरच्या हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावर ते पहुडले होते. हसऱ्या चेहऱ्याने मला म्हणाले, 'शशिकांत, आता बरा झालो की नाडीग्रंथांवरचे उरलेले रेकॉर्डिंग करायला येतो'. फिजीओथेरपिस्ट त्यांना सावकाश उठवून तिथल्या तिथे चालण्याचा व्यायाम सांगत होते. मी हात देऊ केला तर मानेने नकार देत त्यांनी तो व्यायाम पुरा केला. त्याच्या आधी काही दिवस पाय घसरल्याचे निमित्त होऊन कॅप्टन साहेब त्या हॉस्पिटलचा पाहुणचार घेत होते. तेथून बाहेर आले घरी. त्यानंतरच्या काही दिवसातच त्यांच्या देहावसानाची बातमी मनाला खिन्न करून गेली. नाडीग्रंथांबद्दलची माहिती पूर्ण जगाला व्हावी म्हणून त्यांच्या शैलीदार इंग्रजीमधून केलेले कथन त्यांनी दिलेल्या ट्रायल इंटरव्ह्युमधून मात्र आम्हा नाडीग्रंथप्रेमीं जवळ एक खजिना म्हणून राहिले. सुयोग्य वेळी त्या व्हिडीओ  टेपला विविध मार्गांनी प्रसिध्दी मिळेल आणि कॅप्टन राव, शेरलॉक होम्स या व्यक्तिमत्वासारखे आणि कित्येक महान साहित्यकारांच्या बरोबरच नेहमीच आठवले जातील. निदान आमच्यासारख्या काही चाहत्यांच्या मनात... धन्यवाद...